Sunday, February 19, 2017

चेटूक- विश्राम गुप्ते

विश्राम गुप्तेंचं नारी डॉट कॉम हे एकमेव पुस्तक मी या आधी वाचलेले होते आणि मला ते आवडले नसल्याने ’चेटूक’ जराशा साशंकतेनेच हातात घेतले. त्यात पुस्तकाचा आकार जाडजुड. मुखपृष्ठही जुन्या शैलीतलं. (तसं ते मुद्दाम केलं आहे हे नंतर लक्षात येतं). पण पुस्तकांशी नव्याने जोडलं जाण्याचा प्रयत्न करत असताना नवे ( म्हणजे माझ्याकरता नवे) लेखक जाणीवपूर्वक धुंडाळायचे ठरवले आहे हे एक. आणि दुसरे, लायब्ररीमधे त्यावेळी समोर अजुन कोणतीच जास्त इंटरेस्टींग पुस्तके नव्हती.

’चेटूक’ वाचायला लागल्यावर हे काही तरी वेगळंच प्रकरण आहे हे लक्षात आलं. नागपुरकर दिघे कुटुंब जिथे रहातं असतं त्या टिपणिसपु-याचं, तिथल्या रस्त्याचं, घरांचं साठेक वर्षांपूर्वीच्या काळातलं जे वर्णन विश्राम गुप्ते करतात ते आपल्याला फ़ारच आवडत आहे हे लक्षात यायला वेळ लागला नाही. दिघे कुटुंबातल्या व्यक्ती, त्यांचे आपापसातले संबंध, टिपणीसपु-यातलं जग आणि त्या जगात प्रवेशणारी ती विलक्षण राणी आणि तिचा वसंता.. सगळ्याची एक अद्भुत वीण तयार होते. फ़ार प्रयत्न न करता गोष्टीत गुंतायला होतं.

पुस्तकाची भाषा आवश्यक त्या जुन्या वळणाची. विश्राम गुप्तेंची नॅरेटीव शैली वर वर साधी, पण जो कोणी हे सांगत आहे त्याचा या सगळ्या घटनेशी फ़ार जवळून संबंध आलेला आहे हे पहिल्या काही पानांमधेच लक्षात येते आणि मग हा निवेदक या नात्यांच्या वेणीतला नेमका कोणता पेड हे ओळखण्याचाही एक समांतर खेळ वाचताना मनाशी खेळला जातो.

पन्नासच्या दशकात एक सुंदर, आक्रमक स्वभावाची, स्वतंत्र, सुशिक्षित, इंदोरच्या शाही वातावरणात वाढलेली एक मुलगी एका सुंदर, कवी मनाच्या पण भाबड्या, साध्या, आदर्शवादी विचारसरणीच्या घरात वाढलेल्या मुलाच्या पुस्तकी प्रेमात पडते, प्रेमापेक्षा प्रेम या संकल्पनेवरचे, प्लेटॉनिक धर्तीचे प्रेम त्या मुलीच्या मनात. जेमतेम सोळा सतराचे वय. अर्धवट झालेले शिक्षण, प्रेमाच्या झंजावातात वहावत गेलेले दोघे आणि त्या वावटळीत सापडलेली त्यांची कुटुंबे. लग्न होतं आणि या पुस्तकी प्रेमाला वास्तव जगातले व्यवहार ताळ्यावर आणतात.
प्रेम म्हणजे पत्रातून मारलेल्या गोड गोड, काव्यमय, बौद्धिक गप्पा नाहीत, त्यात शारिरिकता असते, व्यवहार असतो, पैसे कमावणं असतं, सासरच्यांशी, घराशी जमवून घेणं असतं, मुलंबाळं असतात, त्यांना वाढवणं असतं आणि अपरिपक्व, हवेत उडणा-या मनाला हे सगळं झेपतच असं नाही. राणीच्या मनाला यातलं काहीच नाहीच झेपत. प्रेमाच्या गुलाबी रंग झपाट्याने विरतो. वसंत तर ग्रीष्मात सापडल्यासारखा या सगळ्यात अनाठायी होरपळून गेलेला. राणीच्या प्रेमाचा झंजावात मुळातच त्याच्या कोवळ्या, साध्या मनाला न झेपलेला. तरीही त्याची तिच्याशी जोडलं जायची असाहाय, एकतर्फ़ी धडपड.
राणीचं मन आता नव्याने प्रेमाचा मुलामा चढवून घ्यायला आसुसलेलं. वसंताच्या मित्राच्या रुपाने राणीला नव्याने ते काव्यमय प्रेम आपल्या आयुष्यात आल्याची खात्री पटते. तिचा हट्टी, आक्रमक, स्वत:ला हवं तेच खरं करण्याचा स्वार्थी स्वभाव, संसाराच्या व्यापतापाला कंटाळलेलं, अजूनही अपरिपक्वच असलेलं मन त्या मुलाम्यात पुन्हा गुरफ़टतं. राणी घराबाहेर पडते. मुलांना, नव-याला मागे सोडून. पण पुन्हा एकदा तो मुलामाच असल्याचं तिच्या लक्षात येतं.
या टप्प्यावर एक वाचक म्हणून आपण पोचतो आणि अचानक लक्षात येतं की निवेदक या मुलांपैकीच एक आहे. आणि मग या सगळ्या कहाणीला एक वेगळं स्वरुप येतं. काहीसं आत्मकथनात्मक.
चेटूक आपल्यावर पुरतं गारुड करतं या टप्प्यावर.

राणी आणि वसंत दिघे या जोडप्याचीच फ़क्त ही गोष्ट उरलेली नसते. तशी ती मुळातच नसते. दिघे घरातले सगळेच, विशेषत:  स्वातंत्र्यसैनिक अमॄतराव दिघे आणि त्यांच्या पत्नी, खंबीर नागूताई यांची गोष्टही तितकीच प्रभावी, स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा काळ, सामाजिक बदल, हिंदी सिनेमा आणि त्यातली गाणी, साहित्य, कवितांचे जग, या सगळ्या गोष्टी समांतरपणे राणी-वसंताच्या गोष्टीमधे आपापली जागा ठळकपणे घेत असतात. या सगळ्याची गुंफ़ण फ़ार छान घातलेली आहे गुप्त्यांनी.

मानवी नातेसंबंध, त्यांच्यातली ओढ, दुरावा, हेवेदावे, आकर्षण.. या सगळ्य़ा भावना सनातन असतात. मात्र या भावनांच्या अभिव्यक्तीवर ती माणसे ज्या काळात जन्मली, मोठी झाली, त्यांच्यावर ज्या घराचे, आजूबाजूच्या जगाचे, ज्यात अगदी घरासमोरचा रस्ताही आला, संस्कार झाले ्त्याचा किती दाट, विलक्षण परिणाम होत असतो हे चेटूक वाचताना स्पष्टपणे जाणवले.

चेटूकमधे आपण एक वाचक म्हणून कोणत्याही टप्प्यावर जजमेन्टल होऊ नये, कोणाचीच बाजू बरोबर, चूक अशा काळेपांढरेपणे आपण घेऊ नये याची काळजी नॅरेटर घेतो. अर्थातच जाणीवपूर्वक.. त्यात तो यशस्वी होतो.

राणी व्हिलन नाही आणि वसंता बिचारा नाही. प्रेम, आकर्षण,संमोहनाचे जाळे प्रत्येक व्यक्तीकरता वेगळ्या पोताचे, एखाद्याकरता ते चिवट, दुस-याकरता त्यातून सहज निसटणे शक्य, काहींकरता हे जाळे फ़क्त स्वत:वरच्या प्रेमापुरतेच तोकडे. त्यात दुस-याला मुळातच फ़ार जागा नसते.   त्यांच्यावर चेटूक परिणाम करत नाही. त्यांचं चेटूक मात्र ज्यांच्यावर पडतं ते कायमच जाळ्यात कैद. चेटूक उतरवण्याचा मंत्रही त्यांच्याकरता निष्प्रभ ठरतो.
थोडक्यात काय- विश्राम गुप्तेंची ’चेटूक’ कादंबरी वाचनीय. आवडली.
 

Saturday, April 22, 2006

A book is not only a friend, it makes friends for you

April 23rd... जागतिक पुस्तक दिनाचा मुहूर्त साधून ह्या ब्लॉगचा शुभारंभ केला आहे.

पुस्तके वाचली गेली पाहिजेत. त्यांच्याबद्दल बोललं गेल पाहिजे. पुस्तके नुसतीच बुक शेल्फ़वर धूळ खाण्यासाठी जन्माला आलेली नसतात.

A book lying idle on a shelf is a wasted ammunition.
Like money, books must be kept in constant circulation.
Lend and borrow to the maximum... of both books and money!
But especially books,
for books represent infinitely more than money.
A book is not only a friend, it makes friends for you.
When you have possessed a book with mind and spirityou are enriched.
But when you pass it on you are enriched threefold.

अगदी खरं वचन आहे हे. पण ते अंमलात आणल जात नाही.. विशेषत: मराठी वाचकांकडून हेच तर खरं दु:ख!. .

हा लेख वाचा


पण तरीही माझ्यामते अजूनही खूप पुस्तके मराठीत अशीही आहेत जी आपल्याला भरभरुन आनंद देतात. देत रहातील. त्यांच्याबद्दल बोलूयात की आपण!